अंजली खमीतकर
पुणे -एक मार्च ते एक जुलै 2021 या चार महिन्यांतील बाधितांच्या संख्येने नऊ मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या एक वर्षातील बाधितांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. एक वर्षात जेवढे बाधित सापडले त्यापेक्षा जास्त बाधित एक मार्च ते एक जुलै 2021 या कालावधीत सापडले आहेत. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.
नऊ मार्च 2020 रोजी पुण्यात पहिला करोनाबाधित सापडला आणि त्यानंतर बाधितांची संख्या वाढण्याला सुरुवात झाली. एक मार्च 2021 पर्यंत म्हणजे एक वर्षाने बाधितांची संख्या दोन लाख तीन हजार 108 झाली. वास्तविक डिसेंबर 2020 पासून बाधितांची संख्या कमी होण्याला सुरुवात झाली होती.
बाधित होण्याचा वेगही कमी होता. मात्र पुन्हा मार्च 2021 पासून तो वाढण्याला सुरुवात झाली. त्यातून नव्या व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या तर वाढलीच परंतु रुग्ण गंभीर होण्याचे आणि मृत्यू पावण्याचे प्रमाणही प्रचंड वाढले.
या चार महिन्यांत एका वर्षाचे रेकॉर्ड ब्रेक झाले आणि दोन लाख 79 हजार 880 बाधितांची नोंद केवळ चार महिन्यांत झाली. एवढेच नव्हे तर बाधित मृत्यूंची संख्याही वर्षभरात जेवढी आहे सुमारे तेवढी चार महिन्यांत झाली आहे. वर नमूद केलेल्या मागील वर्षभराच्या कालावधीत 4 हजार 859 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर यावर्षी केवळ चारच महिन्यांत 3 हजार 821 बाधितांचा मृत्यू झाला आहे.