विटा सांगली – सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे साधारणपणे बाराही महिने दुष्काळी भाग. विटा-खानापूर तालुक्यात पावसाचे प्रमाणही अल्पच असते आणि सिंचनाच्या योजना आता आता येऊ लागल्या आहेत. या दुष्काळी परिस्थितीवर मात करत कोरडवाहू शेतीमधून मुबलक उत्पादन घेण्याची किमया विटा येथील संतोष आणि आकाश जाधव या दोन मित्रांनी साधली आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या व्हिडीओला जगभर प्रसिद्धी मिळत आहे.
विटा या सांगली जिल्ह्यातील लहानशा गावातील या दोन मित्रांनी 2018 मध्ये इंडियन फार्मर नावाची युट्युब वाहिनी सुरु केली. त्यांचा उद्देश होता शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाशी परिचय करुन देणे. या वाहिनीला 18 लाखाहून अधिक सब्स्क्राईबर्स मिळाले असून वेगाने ही वाहिनी लोकप्रिय होत आहे. “क्यूकि क्रिएटर’ “इंडियन फार्मर’ ने “युट्युब ओरिजिनल्स-क्रिएटर स्पॉटलाईट सिरीज’च्या माध्यमातून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या जागतिक व्यासपीठाची छोट्या माहितीपटांची सिरीज काही विलक्षण कामगिरी करणाऱ्या युट्युब क्रिएटर्सच्या स्टोरीज प्रस्तुत करते.
“क्रिएटर स्पॉटलाईट : इंडियन फार्मर’चा भाग येथे पाहा
प्रत्यक्ष शेतातील अनुभव आणि इंटरनेट या दोन्हीचा इंडियन फार्मरच्या यशामध्ये आणि प्रसिद्धीमध्ये मोठा वाटा आहे. या भागात आपल्याला संतोष आणि आकाश जाधवचे भारतीय शेतीला वेगळे आणि अर्थपूर्ण वळण देण्याचे प्रयत्न दिसतात. आज भारताच्या विविध कोपऱ्यातले शेतकरी संतोष आणि आकाशच्या या युट्युब वाहिनीला भेट देतात आणि आपल्या शेतीविषयक अडचणी सोडवतात. येथे त्यांना आपल्या शेतीला आणखी प्रगत करण्याविषयी टिप्सदेखील मिळतात.
इंडियन फार्मर चे संतोष जाधव आणि आकाश जाधव म्हणतात, आम्ही महाराष्ट्राच्या शेतीसंपन्न अशा सांगली जिल्ह्यातून आलो आहोत. आम्ही भाग्यवान होतो त्यामुळे आम्हाला तंत्रज्ञानाचा फायदा घेता आला. आमच्या आसपासच्या भागात अनेक चांगले शेतकरी आहेत. पण आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला तरीही काही अडचणींवर मार्ग निघत नव्हता. त्यामुळे आम्ही “इंडियन फार्मर’ हे चॅनल सुरु केले ज्याच्या माध्यमातून आम्ही भारताच्या मोठ्या शेतकरी कुटुंबासोबत माहिती आणि साधनांची देवाण-घेवाण करू लागलो. आम्ही शेतकऱ्यांच्या रोजच्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
व्हिडीओ मध्ये आम्ही प्रत्येक सूक्ष्म माहिती व्यवस्थित दाखवतो कारण आम्हाला शेतकरी आणि तंत्रज्ञान अथवा प्रशिक्षण यांतील वाढत चाललेले अंतर कमी करायचे आहे. युट्युब क्रिएटर स्पॉटलाईट एपिसोडमुळे आम्हाला सुखद धक्का बसला आणि त्याने आमचा उत्साह द्विगुणित झाला. या जागतिक महामारीच्या काळात हा व्हिडीओ निश्चितच आम्हाला आमच्या प्रेक्षकांपर्यंत म्हणजे भारताच्या हिंमतवान शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला मदत करेल.
युट्युब क्रिएटर स्पॉटलाईट च्या भागात संतोष आणि आकाशाचा शालेय मैत्रीपासून इंडियन फार्मर वाहिनी सुरु करेपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. संतोषला शेतीची पार्श्वभूमी होती तर आकाश इंजिनिअर आहे. त्या दोघांनी शेती आणि तंत्रज्ञानाला एकत्र आणून आपल्या समाजातील अन्य शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडवायला सुरवात केली.
दुष्काळ, सिंचन, खते, छोटे किडे, शेतीविज्ञान,पॉलिहाऊस उभारणे, व्यवसाय-विपणन अशा अनेक विषयांवरील व्हिडीओज असणाऱ्या या वाहिनीचे आज 18 लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. संतोष आणि आकाश दोघेही असे मानतात की शेती अजूनही इतिहासजमा झालेली नाही. उलट भारतीय तरुणांनी करियर म्हणून शेतीकडे पाहिले पाहिजे.