छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मतदारांवर छाप पडावी म्हणून उमेदवारांसह राजकीय नेत्यांनी खादीचे नवे कपडे घेण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील एका नामांकित खादी उद्योगातून उमेदवारांनी तब्बल १२५ ड्रेस खरेदी केले आहेत. सर्वाधिक २५ ड्रेस जालन्याचे उमेदवार व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खरेदी केले.
नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भर खादीचे जॅकेट घेण्यावर आहे, असे विक्रेते अनिकेत तांदळे यांनी सांगितले. रावसाहेब दानवे व संदिपान भुमरे २,५०० रुपये मीटर दराचा लिनन खादीचा कपडा वापरतात,
तर चंद्रकांत खैरे ९०० रुपये मीटर दराची सिल्क खादी वापरतात. निवडणूक काळात सुमारे १२ लाख रुपयांची खादी कपड्यांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. रंगीत खादीलाही मोठी मागणी असल्याचे ते म्हणाले.
लग्नसराईचा व निवडणुका एकाच वेळी आल्यामुळे काही दिवसांत खादीचे रेडिमेड जॅकेट, डिझायनर कुर्ते उन्हाळ्यात कॉटन मिक्स खादीचीही प्रचंड चलती आहे. यामुळे खादी ग्रामोद्योगालासुद्धा आता चांगले दिवस आले आहेत.
खादीचे कपडे शिवणारे टेलर वाढले अन् शिलाई देखील काही कार्यकर्ते ७०० ते ९०० रुपये मीटरप्रमाणे जॅकेटसाठी कापड खरेदी करतात. काही दुकानांमध्ये खादीचे कपडे शिवून देणारे टेलर आहेत. खादीच्या पूर्ण ड्रेससाठी किमान ७०० ते १,५०० शिलाई द्यावी लागते.
खादी कापड घेऊन ते जॅकेट शिवून घेण्याकडे काही ग्राहकांचा कल आहे. विविध रंगांचे खादीचे कापड जॅकेटसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांसमोर भरपूर पर्याय असल्याची माहितीही तांदळे यांनी दिली.
खादीचे विविध प्रकार
पायजामा, चुडीदार, मोदी पॅटर्न, सिल्क खादी, आमदार खादी, मटका खादी, पेपर कॉटन, लिनन खादी या प्रकारच्या खादीला जास्त मागणी आहे.