पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीत (एमडीए) लवकरच मुलींनाही प्रवेश मिळणार आहे. आगामी काळात लष्करात महिला अधिकारी यांचा सहभाग वाढणार आहे. मुलांप्रमाणेच मुलीही उत्तम कामगिरी करतील. त्यामुळे येत्या तीस ते चाळीस वर्षांत लष्करप्रमुखपदाची धुरा कदाचित एखाद्या महिला अधिकाऱ्याकडे जाईल, असा विश्वास लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 141 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळ्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना जनरल नरवणे म्हणाले, “सध्या लष्कराच्या गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी येथे महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. लष्करात विविध पदांवर महिला कार्यरत आहेत. त्यातच एनडीएमध्येदेखील मुलींना प्रवेशाचे द्वार खुले झाले आहे. याद्वारे स्त्री-पुरूष समानतेकडे सैन्याने एक पाऊल पुढे टाकले आहे. आगामी काळात सैन्य दलातील अनेक महत्त्वपूर्ण पदावर महिला अधिकारी कार्यरत राहतील, असा विश्वास मला वाटत आहे.’ एनडीएमध्ये मुलींसाठी काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. मात्र, त्याचवेळी प्रशिक्षण कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही. प्रबोधिनीत मुलींनाही मुलांप्रमाणेच प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यासाठीचे निकष समानच असतील.
त्याचबरोबर प्रबोधिनीत मुलींचा नि:पक्ष आणि व्यवहारिकदृष्ट्या व्यापक दृष्टीकोनातून स्वीकार व्हावा, असेही जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले.
“अंतिम पग’ हे आयुष्यातील जबाबदारीकडील पहिले पाऊल
दीक्षांत संचलन सोहळ्याप्रसंगी प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना जनरल नरवणे यांनी प्रबोधिनीला असलेल्या महान परंपरेचा उल्लेख करत, त्या परंपरेचे पाईक होण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर तिन्ही दलांप्रती आदर राखण्याचे आणि योग्य समन्वय साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी प्रशिक्षणार्थींचे प्रबोधिनीतील “अंतिम पग’ हे आयुष्यातील जबाबदारीकडील पहिले पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले.
“मी मूळचा राजस्थानमधील जयपूर येथील असून, माझे वडील सरकारी शिक्षक आहेत, तर आई उत्पादन शुल्क निरीक्षक आहे. आठवीत असताना मी डेहराडून येथील राष्ट्रीय मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून माझे नौदलात जाण्याचे स्वप्न होते. “एनडीए”तून उत्तीर्ण होणे, हा माझ्यासाठी गौरवाचा दिवस असून, माझ्या स्वप्नाला मी खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.’
– हर्षवर्धन सिंग, कांस्य पदक विजेता छात्र
“मी मूळचा हैदराबाद येथील असून, घरातील कोणीही सैन्य दलात नाही. माझे आई-वडील गेल्या सात वर्षांपासून दुबईत राहात आहेत. तेथे एका खासगी शाळेतून मी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. एनडीएमध्ये येऊन, यशस्वीपणे येथील प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल अतिशय आनंद होत आहे. या ठिकाणी येण्यासाठी वडिलांनी मला प्रोत्साहन दिले. मला लष्करात जायचे असल्याने मी पुढील प्रशिक्षणासाठी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत जाणार आहे.’
– वामशी श्रीकृष्ण, सुवर्ण पदक विजेता छात्र
“मी विशाखापट्टणम येथून आलो असून, माझे वडिल भारतीय नौदलात कार्यरत आहेत. गोवळकोंड्यात शालेय शिक्षण घेत असताना, तेथील वरिष्ठांनी मला “एनडीए”मध्ये जाण्यास प्रोत्साहन दिले. जगातील सर्वोत्तम आणि प्रतिष्ठित अशा “एनडीए”मधून जोशपूर्ण वातावरणात मी माझे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. मी लष्करात जाणार असून, आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्याच्या आठवणी मी आयुष्यभर जपेन.’
– सिरीपुरल लिखित, रौप्य पदक विजेता छात्र
जनरल एम. एम. नरवणे यांचा विश्वास