पुणे – राज्य तसेच केंद्र आणि पाच वर्षे महापालिकेत सत्ता होती. तरीही आमची कामे होत नाहीत. त्याच वेळी राष्ट्रवादी काॅंगे्रसचे माजी नगरसेवक थेट अजित पवारांना फोन करून महापालिका प्रशासनाकडून कामे मार्गी लावतात. विकासकामे होत नसल्यास निवडणुकांसाठी नागरिकांना कसे सामोरे जायचे ? अशा शब्दांत भाजपच्या माजी नगरसेवकांनी शहराध्यक्षांच्या आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे.
पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे गेल्यानंतर महापालिकेत भाजपच्या माजी नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रलंबित प्रश्नांबाबत त्यानंतर कोणीही बैठक घेण्यात आलेली नाही. त्यातच मनपा अधिकारीही भाजपच्या काही मोजक्याच पदाधिकार्यांची कामे मार्गी लावत आहेत. त्यामुळे उर्वरित माजी नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे. हीच स्थिती राहिल्यास आम्ही नागरिकांना कसे जाणार? असा सवालही हे माजी नगरसेवक खासगीत उपस्थित करत आहेत.
अजित पवार गटातील माजी नगरसेवकांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे असताना तसेच अजित पवार महाविकास आघाडीत असताना या माजी नगरसेवकांच्या पत्र अथवा कामांना महापालिकेत दादही मिळत नव्हती. त्यांना बैठकांनाही बोलवले जात नव्हते. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील शहराच्या प्रलंबित कामांंबाबत तसेच भाजपच्या माजी नगरसेवकांसोबत विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेत होते.
मात्र, पाटील यांच्याकडील पालकमंत्री पद गेल्यानंतर या बैठका जवळपास बंदच झाल्या आहेत. तर भाजपच्या माजी नगरसेवकांना प्रशासनाकडूच दादच दिली जात नसल्याचे चित्र आहे. तर, शिवसेनेच्या पदाधिकार्यांसाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच धावून येत आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शिवसेना सुपात असून भाजप मात्र जात्यात सापडली आहे.
दादा फक्त कोथरूडपुरतेच
गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्र चंद्रकांत पाटील हे प्रशासनाचा आढावा घेत आहेत. मात्र, तो कोथरूड विधानसभा मतदारसंघापुरताच मर्यादित राहिला आहे. तर शहर पातळीवर प्रशासनाच्या आढावा बैठका घेण्यासाठी पदाधिकार्यांना वेळ नसल्याने ऐन लोकसभेच्या तोंडावर अनेक माजी नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे.