Pune Lok Sabha Election 2024 – टिपू सुलतान (Tipu Sultan) हे खरे स्वातंत्रवीर होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढत त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यामुळे पुण्यातील नागरिकांना, विशेषतः तरुण पिढीला त्यांच्या शौर्याची गाथा कळली पाहिजे, या हेतूने पुण्यात टिपू सुलतान यांच्या नावाने उद्यान बनवणार असून तिथे त्यांचे भव्य स्मारक देखील उभारले जाणार आहे, असे एमआयएमचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके (Anis Sundke) म्हणाले. प्रचारानिमित्त एका पदयात्रेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
चर्चेला तोंड फोडले –
दरम्यान, गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान टिपू सुलतानचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. टिपू सुलतान नेमका कशाचं प्रतीक यावरून कमालीचं ध्रुवीकरण पाहायला मिळालं. आता पुणे लोकसभेचे उमेदवार सुंडके यांनी पुण्यात टिपू सुलतानचे स्मारक उभारणार असल्याचे सांगून चर्चेला तोंड फोडले आहे.
आतापर्यंतच्या खासदारांकडून मुस्लीम समाजाचा वोटबॅंक म्हणून वापर –
यावेळी अनिस सुंडके म्हणाले, ‘आतापर्यंतच्या खासदारांनी अल्पसंख्यांक तसेच वंचित समाजाला दुर्लक्षित केले आहे. मुस्लीम समाजाचा वापर फक्त आपली वोटबँक म्हणून केला, परंतु आता आपल्याकडे एक संधी चालून आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिली आहे. त्यामुळे आपल्या समाजासाठी झटणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याची तुमच्याकडे एक संधी आहे. येत्या 13 तारखेला पतंग या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहनही सुंडके यांनी उपस्थित नागरिकांना केले.
दरम्यान, पुणे लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी सर्व पक्षांकडून शहरात जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीच्या पुणे, बारामती, शिरुर, मावळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी 29 एप्रिलला पीएम मोदींची सभा झाली. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली. पुण्यात सगळीकडे प्रचाराचा जोरदार धडाका सुरु आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काॅंग्रेसकडून रविंद्र धंगेकर, वंचिततर्फे वसंत मोरे, तर एमआयएमकडून अनिस सुंडके मैदानात आहेत. यावेळी पुण्यात चौरंगी लढत पहायला मिळत आहे.