राजगुरूनगर – जिल्ह्यात 221 ग्रामपंचायतींसाठी उद्या (रविवारी) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. खेड तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी मतदान साहित्याचा लावजमा आज राजगुरूनगरमधून रवाना झाला. 8 एसटी बससह खासगी वाहनांतून केंद्राध्यक्ष आणि कर्मचारी रवाना झाले.
मतदान प्रक्रियेला सुरूवात होण्याअगोदर उमेदवारांनी आणि नेमलेल्या प्रतिनिधिनी मतदान केंद्रावर सकाळी एक तास अगोदर म्हणजेच सकाळी 6.30 वाजता हजर राहून ईव्हीएम मशिनवर मोफ पॉंल घेतल्यानंतर सर्वाना खात्री पटल्यानंतर प्रत्यक्षात सकाळी 7.30 मतदानाला सुरुवात होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.
मतदान प्रक्रियेसंदर्भात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान संपल्यावर सर्व मतदान केंद्राच्या ईव्हीएम मशिन राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरु तालुका क्रीडा संकुलात जमा करुन तेथेच स्ट्रॉंग रुममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सतत कार्यरत ठेवण्यात येणार असून, मंगळवारी (दि. 20) डिसेंबर रोजी सकाळी 10 मतमोजणी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.
तालुक्यातील 23 पैकी 21 ग्रामपंचायतीपैकी 5 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचाची बिनविरोध निवड झाली. तर 2 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या ग्रामपंचायतीच्या लक्षवेधी निवडणुकांमुळे कोणताही अनुचित गैरप्रकार घडु नये यासाठी जादा पोलीस व राखीव पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. चास ग्रामपंचायत संवेदनशील असल्यामुळे येथे निवडणुकीत जादा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे
पोलिसांचा चोख बंदोबस्त
खेड तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत 54 लोकनियुक्त उमेदवाराचे आणि तर 21 ग्रामपंचायतीच्या 110 सदस्यपदाच्या जागांसाठी 233 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये आज बंद होणार असुन. मतमोजणी मंगळवारी (दि. 20) होणार आहे. निकाल ऐकण्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे निकालानंतर होणारा संभाव्य कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त चोख ठेवला जाणार आहे.