राजगुरूनगर/टाकळी हाजी : समाज घडविणाऱ्या गुरुजनांचे सन्मान समाजात सर्वात आधी व्हायला हवेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी केले.
लोकसेवा प्रतिष्ठान, नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल आणि पुणे जिल्हा पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी व 8 वीचे शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थी यांच्या गुणगौरव सोहळ्यात फुलगाव (ता. हवेली) येथे ते बोलत होते.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये दरवर्षी पाचपेक्षा अधिक मुले शिष्यवृत्तीत आणणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होतोय परंतु इतर शिक्षक सन्मानाविना राहून जातात. त्यांचेही कष्ट मोलाचे आहेत. शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक दररोज विद्यार्थ्यांचे जादा तास घेतात. वर्षभर सुट्ट्या न घेता, इतर कार्यक्रमांना उपस्थित न राहता मुलांना वेळ देऊन त्यांचा सराव करून घेतात. जिल्ह्यातील अशा सर्व गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा आणि इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळावी, म्हणून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
गुणगौरव उपक्रमाबद्दल लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी पदवीधर शिक्षक संघटनेचे अभिनंदन केले. कार्यक्रमास पदवीधर संघटनेचे माजी राज्याध्यक्ष सावंत सर, सरचिटणीस अनिल पलांडे, जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे, शहाजी पवार, लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे, फुलगाव च्या सरपंच मंदा साकोरे, अनिस कुट्टी, अमीन मुदासर, दीपक दराडे, राजेंद्र पायगुडे, वसंत कामथे, नंदकिशोर पडवळ, लोकसेवाच्या विविध संस्थांचे प्राचार्य, तसेच रामचंद्र नवले, संतोष विधाटे, उमेश धुमाळ, प्रदीप गव्हाणे, नारायण करपे, आप्पा जगदाळे, तुषार वाटेकर यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते, जिल्ह्यातील अनेक शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पलांडे यांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग जगताप आणि आभार प्राचार्य नरहरी पाटील यांनी मानले. गुणवंतांचा गौरव सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येईल असे दीपक पायगुडे आणि शांताराम नेहेरे यांनी सांगितले.
मोठ्या संख्येने सन्मान
गुणवत्ता यादीतील 800 विद्यार्थी व सुमारे 200 शिक्षकांसह राज्य गुणवत्ता यादीत आलेले 35 विद्यार्थी, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शिवराम मुंजावडे, आर. बी. गुजर हायस्कूलचे लिपिक योगेश चव्हाण, कैलास पाचर्णे यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा पातळीवरील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गुणगौरवाचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे अनिल पलांडे यांनी सांगितले.