बारामती – ग्रामीण भागातील घरोघरी जाऊन विविध कामांसह टपाल पोहच करणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून येणारा दबाव, अल्पवेतन, सरकारी सेवेत रुजू करणे, आशा विविध मागण्यांसाठी बारामतीच्या विभागीय डाक कार्यालयाच्या समोर नारे देत देशव्यापी धरणे आंदोलन केले. ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांना कामाच्या तासानुसार वेतन संरचना तयार करण्यात आली आहे.
डाकसेवक कर्मचाऱ्यांना कामाचे तास, पद यानुसार वेतनमान अवलंबुन असते. डाकसेवक कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेवेतन मिळत नसून डाकसेवक कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी ही कामाच्या तासानुसार अवलंबुन आहे. विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी देशात अखिल भारतीय डाक सेवक संघटनेकडून दि. 20 फेब्रुवारी 2023 पासून विभागीय स्तरावर असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे.
विभागीय स्तरावर बिजनेस व टार्गेट सक्तीच्या विरोधात संपूर्ण ग्रामीण डाक सेवकांतर्फे असहयोग आंदोलन छेडले आहे. त्या धरती वर गुरुवार (दि.2) रोजी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेकडून बारामती विभागीय कार्यलयासमोर देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलन कार्यक्रम 16 व 17 मार्च 2023 रोजी लक्षाणिक संप पुकारण्यात आला आहे.
दरम्यान, बारामती विभागाअंतर्गत बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, पुरंदर येथील डाक सेवक मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थित होते. कामगार एकजुटीचा विजय असो, हम सब एक हैं, आमच्या मागण्या पूर्ण करा, आशा घोषणा देऊन प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
अल्प वेतनामुळे…
ब्रिटिश काळापासून ग्रामीण डाक सेवक यांना सरकारी सेवेत घेण्याची मागणी प्रलंबित आहे. अल्प वेतनामुळे कुटुंबाची वाताहत होत आहे. ब्रॅंच पोस्ट मास्टरची सर्व कामे, टपाल वाटप करणे, डिलिव्हरी एजंट, इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक, आधार कार्ड लिंक करणे, आयबीपी अकाउंट काढणे, पीएम किसान अकाउंट काढणे, गर्भवती माता यांची बॅंक अकाउंट काढणे अशी विविध कामे डाक सेवक करत आहेत.
या आहेत मागण्या…
-ग्रामीण डाक सेवक यांना खात्या अंतर्गत सेवेत रुजू करून घ्यावे
-जीडीएस समितीने शिफारस केल्याप्रमाणे 12/24/36 प्रमाणे सर्व ज्येष्ठ ग्रामीण डाक सेवक यांना वेतनवाढ देण्यात यावी
-डायरेक्टरद्वारे अत्याधिक व अव्यवहारिक टार्गेट देऊन डाक सेवक यांना होत असलेला मानसिक व शारिरिक त्रास थांबवावा
-अधिकाऱ्यांकडून बेकायदा आदेश काढून टार्गेटच्या नावाखाली दमदाटी करणे, बदली करणे, धमक्या देण्याचे प्रकार थांबवा
-डाक सेवक कर्मचारी रजेच्या काळात बदली
-कर्मचारी लावण्याची परवानगी देणे.
-पाच लाख रुपयांपर्यंत सामूहिक विमा संरक्षण व पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी पाच तासांहून आठ तास ड्यूटी करण्यात यावी