पुणे-सातारा महामार्गासाठी चार हजार कोटींचा अहवाल
पुणे : पुणे-सातारा बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे ते रावेत या दरम्यान सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आता कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. नऱ्हे ते रावेत या दरम्यान एलिव्हेटेड हायवे उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चार हजार कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
पुणे सातारा बाह्यवळण महामार्गावरील देहूफ ाटा ते नऱ्हे आंबेगाव या दरम्यान नेहमीच वाहतूक कोंडी होते. या महामार्गालगत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. तसेच हिंजवडी -बालेवाडी, रावेत – वारजे, बाणेर या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते.
बाह्यवळण महामार्गावर नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल ते वारजे व चांदणी चौक ते रावेत येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम निकाली काढण्याची मागणी खासदार सुळे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर नऱ्हे ते रावेतदरम्यान एलिव्हेटेड हायवे उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेतला असून, त्यासाठीची प्रकल्प अहवालसुद्धा तयार करण्यात आला आहे. खासदार सुळे यांनी गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी सुळे यांनी ही माहिती दिली.
वाहतूक कोंडी दूर होणार
वडगाव येथील पुलासह वारजे येथील मुठा नदीवरील पूल आणि दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्याचे काम करण्यासाठी 36 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावर होणारी वाहतूक कोंडी दूर होणार आहे. सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन या भागातील दळणवळण अधिक सुसह्य आणि सक्षम होणार असल्याचे खासदार सुळे यांनी यावेळी सांगितले.