पुणे – पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या बस उभा करण्यासाठी जागा नसताना पीएमपी प्रशासनाने अदानी टोटल गॅस लि. कंपनीच्या मदतीने सात ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पीएमपीच्या डेपोमध्ये खासगी वाहनांची भर पडणार असून पीएमपीचे बस संचलन करण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पीएमपीने संचलन तूट भरून करण्यासाठी खासगी वाहनांसाठी ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीच्या काही निवडक जागांवर हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. खासगी वाहनांसाठी 24 तास चार्जिंग सुविधा उपलब्ध असणार आहे. पण, पीएमपीकडेच बस उभ्या करण्यासाठी जागा नसताना हा खटाटोप कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ठेकेदारांच्या बस पीएमपीच्या डेपोत आणि स्वत:च्या मालकीच्या बस स्वारगेट-कात्रज रस्त्याच्या कडेला उभ्या असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच पीएमपीच्या डेपोत जर चार्जिंग स्टेशन उभे केल्यास येथे भविष्यात खासगी वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे दिवसभर बस संचलनात आणण्यासाठी देखील अडचणी येऊ शकतात, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे पीएमपीच्या या निर्णयावर चौफेर टीका होताना दिसते आहे. पण, दुसऱ्या बाजूला या सर्व प्रकारांवर प्रशासनाकडून कोणीही अधिकृत भूमिका मांडण्यास तयार नसल्याने चर्चांना पेव फुटले आहे.
मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष
“पीएमपी’ने “पीएमआरडीए’कडे डेपोसाठी जागेची मागणी केली आहे. दुसऱ्या बाजूला त्यांच्या हद्दीतील जागेचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. पीएमपी प्रशासनाचा मूळ उद्देश सार्वजनिक वाहतूक सेवा देणे हा आहे. पण, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करून इतर मार्गाने उत्पन्न मिळविण्याच्या मागे धावत असल्याचे दिसून येते.
या सात ठिकाणांचा समावेश :
हिंजवडी, कात्रज, बाणेर-सुस रस्ता, भोसरी, पूलगेट, डेक्कन जिमखाना, हिंजवडी फेज-2 आदी सात ठिकाणी ई-वाहनासाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.