नांदोशीच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांकडून जवानांना भेटकार्ड
पुणे – नांदोशी (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सीमेवर देशाचे रक्षण क रणाऱ्या सैनिकांना दिवाळीनिमित्त भेटकार्ड पाठविण्यात आली. तीस चिमुकल्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. आधार सामाजिक संस्थेने यामध्ये सहकार्य केले, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कळंबे यांनी दिली.
“आम्हाला आपला अभिमान आहे’, “आपली दिवाळी आनंदमय होवो’, “दिवाळीनिमित्त शुभेच्छा’, “आम्ही आपले आभारी आहोत’ अशा मजकुराचे शुभेच्छा संदेश यामध्ये पाठविण्यात आले. “आम्हाला दिवाळी शुभेच्छा सैनिक काकांना पाठविताना खूप भारवल्यासारखे वाटत आहे’, अशी भावना विराज मुळे या विद्यार्थ्याने व्यक्त केली.
असद तांबोळी याने, “कोणताही आनंदाचा सणसमारंभ असो, सैनिक बांधव सीमेवर कर्तव्य बजावत असतात असतात म्हणून देश सुरक्षित असतो,’ असे मत व्यक्त केले. मानसी घुले, श्रावणी रामाणे, चेतन पवार आदी विद्यार्थ्यांनी आनंदी भावना व्यक्त केली.
उपशिक्षिका वैशाली भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशभक्ती आणि सैनिकांप्रती आदरभाव कलाकृतीच्या माध्यमातून सादर करता आला, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. गोऱ्हे बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.