पुणे – सारसबाग चौपाटीवर फूड प्लाझा विकसित केला जाणार आहे. त्यासाठीच्या सुधारित आरखड्यास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याच्या निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
येथील खाद्य पदार्थांचे स्टॉल सणस मैदानाच्या बाजूला स्थलांतरित केले जाणार असून सध्याचा रस्ता वॉकिंग प्लाझा केला जाणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून यापूर्वी या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, त्यावर आक्षेप तसेच त्रुटी काढण्यात आल्याने काम रखडले होते. अखेर भवन विभागाने सुधारित आराखडा तयार केला आहे.
सारसबागेची सीमाभिंत आणि सणस मैदान सीमा भिंतीदरम्यान खाऊ गल्ली, नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक रचना, सुशोभीकरण, विविध कलाकृती सादर करण्यासाठीचे छोटेखानी मंच करण्याचे नियोजन आहे. सध्या चौपाटीसमोरील रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर होतो. फूड प्लाझा करताना येथील रस्ता बंद करण्यात येणार आहे.