काटेवाडी येथे तीन कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
काटेवाडी – भूमिपूजन करण्यात आलेली कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. यासाठी ग्रामस्थांनी पाच ते सात व्यक्तींची एकत्र येऊन देखरेख समिती नेमावी. त्यामुळे गावातील प्रत्येक काम हे चांगल्या प्रतीचे होईल व खऱ्या अर्थाने या कामांचा लाभ जनतेला ही चांगल्या पद्धतीने मिळेल, असे प्रतिपादन बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
काटेवाडी (ता. बारामती) येथे सुनेत्राताई यांच्या हस्ते 2 कोटी 85 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. सोमवार (दि. 5) सकाळी दहा वाजता मासाळवाडा येथून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यास सुरुवात झाली. याप्रसंगी सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच श्रीधर घुले, बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष संभाजी होळकर, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे,
तंटामुक्तीचे अध्यक्ष के. टी. जाधव, संजय काटे, अनिल काटे, राजेंद्र पवार, समीर मुलाणी, शितल काटे, हरिश्चंद्र मासाळ, मिलिंद काटे, प्रकाश काटे, राजू भिसे, दादा भिसे, दत्तात्रय काटे, दिगंबर मदने, मारुती मासाळ, रणजीत गायकवाड, जितेंद्र काटे, स्वप्निल काटे, धीरज घुले, पप्पू काटे, किरण वायसे, दत्तात्रय कोळेकर, ग्रामविकास अधिकारी कैलास कारंडे, पोलीस पाटील सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
काटेवाडीची ओळख देशात
माजी कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काटेवाडी गावाचा विकास आजपर्यंत मोठ्या प्रमाणात झाला आहे. अजूनही ज्याठिकाणी विकास होण्याची गरज आहे त्याठिकाणी विकास केला जात आहे. त्यामुळेच काटेवाडीची ओळख ही संपूर्ण देशामध्ये विकासाचे मॉडेल गाव म्हणून आहे.