पिंपरी -ताथवडेगाव 1997 ला महापालिकेत समाविष्ट झाले. 2012 साली महापालिकेने विकास आराखडा प्रसिद्ध केला. 2017 मध्ये राज्य सरकारने 26 बदल करून मंजूर केला. ताथवडे भागातील फक्त बीआरटी रस्ता झाला. महापालिकेत ताथवडेगाव समाविष्ट होण्यापूर्वी जसे रस्ते होते, तसेच रस्ते आजही आहेत. एकही रस्ता विकसित झाला नाही. त्याप्रमाणे या भागातील महापालिकेने अद्याप एकाही आरक्षण ताब्यात घेतले नसून विकास दूरच असल्याचे युवा नेते चेतन पवार म्हणाले.
दै. प्रभातच्या पिंपरी-चिंचवडच्या विभागीय कार्यालयामध्ये श्रीं ची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. गणरायाच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी पवार आले होते. त्या वेळी पवार यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला. याप्रसंगी चेतन भुजबळ आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
ताथवडे गाव हे नव्याने विकसित होत आहे. या भागात सातत्याने नव-नवीन ग्रह प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र, या भागातील मुलांना खेळण्यासाठी, नागरिकांना फिरण्यासाठी एकही उद्यान नाही. ग्रामपंचायतीमध्ये असलेली शाळाही अद्याप महापालिकेने वर्गीकरण केले नाही. ताथवडे गावातील रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आम्ही विविध प्रश्नासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. या भागातील रस्त्यावर खड्डे पडले की महापालिका माती आणून टाकते. पाऊस पडला की पुन्हा खड्डे पडतात, असे पवार म्हणाले. त्यामुळे आम्हाला पालिकेतून मुक्त करून आमची ग्रामपंचायत होती, तशीच ग्रामपंचायत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.