बिबवेवाडी, दि. 6 (प्रतिनिधी) – युद्धभूमीवर शत्रूंबरोबर लढताना आपल्या प्राणाची पर्वा न करता मातृभूमीचे रक्षण करताना शूरवीरांना कायमचे अपंगत्व आले पण तूसभरही शौर्य, जिद्द कमी न होता आपल्या देशाबद्दल तीच राष्ट्रभक्ती तेवत ठेवत हे “जवान’ आज आयुष्य जगत आहेत. खडकी येथील पॅंराप्लेजिक रिहॅंबिलेटशन सेंटर (पीआरसी) अर्थात माजी अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात या सैनिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यांच्यातील एकाकीपण दूर व्हावे, सकारात्मकता वाढावी या उद्देशाने “उत्सव रंगे…बाप्पा संगे’ या उपक्रमाचे आयोजन रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन आणि आयलीज डान्स अँड आर्ट अँकॅंडमीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी सावनी सहस्त्रबुद्धे यांच्या कथ्थक नृत्याने वातावरण भक्तीमय होऊन गेले. गायक हिम्मतकुमार पंड्या, राजेश शिंगाडे, गायिका गितांजली जेधे यांनी आपल्या स्वराभिषेकाने या विशेष रसिकांना वेगळीच अनुभूती दिली. अभिनेत्री आयली घिया हिने लोककला आणि भारतीय नृत्यावर सादरीकरण केले.
सुप्रसिद्ध अभिनेते संतोष चोरडिया आणि अभिनेत्री डॉ. कविता घिया यांची संकल्पना, लेखन असणाऱ्या या कार्यक्रमात त्यांनी गणेशोत्सव, त्याची महती आणि सैनिकांचे बलिदान आदी विविध विषयांना स्पर्श करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी पीआरसीचे प्रमुख कर्नल डॉ. आर.के.मुखर्जी, माजी नायब सुभेदार भूपाल सिंग यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ओंकार चोरडिया, रंजना चोरडिया तर लेफ्टनंट कर्नल बी. एल. भार्गव, कर्नल डॉ. आर. के.मुखर्जी तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीय आणि लष्करी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.