आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली शाबासकीची थाप
इंदापूर – गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावाने पुणे जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावत सन 2019-20 सालचा पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार मिळविला आहे.
या निमित्ताने नुकतेच आमदार दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते पुरस्कार व पाच लक्ष रूपयांचे बक्षिस सपकळवाडी ग्रामस्थांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब सपकळ, सरपंच रोहिणी तानाजी सोनवणे, माजी सरपंच शिवाजी सपकळ, शिवाजी बापु सपकळ, अनिल सपकळ, सुदर्शना भुजबळ, जमादार सपकळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, युवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी ग्रामस्थांचे कौतुक करताना सांगितले की, खर्या अर्थाने गावकर्यांची एकजूट व सामूहिक प्रयत्नांमुळे सपकळवाडी गाव जिल्ह्यात प्रथम आले. या छोट्याशा गावाने आपापले घर, दार, अंगण तसेच परिसर स्वच्छ व सुंदर ठेवत संपूर्ण गावाला आदर्शवत बनवले. आपण सपकळवाडी गावात विकासाच्या बाबतीत कोट्यवधी रूपयांचा निधी दिला असल्याने विकासकामात हे गाव तर अग्रेसर आहेच.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्यासाठी सरपंच रोहिणी सोनवणे, उपसरपंच सचिन सपकळ तसेच इतर सर्व कार्यकर्ते तळमळीने प्रयत्न करत असतात. या गावाला व वाड्यावस्त्यांना जोडणारे मुख्य रस्ते पुर्णत्वास गेले आहेत. तसेच गावांतर्गत असणार्या सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे, या ठिकाणी जलसंधारण, ओढा खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने पाण्याची नैसर्गिक उपलब्धता आहे्. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची 24 तास सोय, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आदींची सुविधा अतिशय उत्तम असल्यामुळे सपकळवाडी गाव खर्या अर्थाने बाकी खेड्यांसाठी एक विकास मॉडेल ठरले असल्याचे गौरवोद्गार आमदार भरणे यांनी काढत ग्रामस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सपकळवाडी गावामध्ये आमूलाग्र बदल झाला असून मी सरपंच असताना आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळवून दिला आहे. तसेच प्रत्येक योजना गावामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. सोबतच गावच्या विकासासाठी आमदार भरणे मामा लागेल तेवढा निधी मंजूर करत असतात. त्यामुळे आमच्या गावाला सर्वच बाबतीत सौंदर्य प्राप्त झाले आहे. म्हणून या स्पर्धेचे सर्व निकष पार करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत आम्ही प्रथम क्रमांक पटकावला.
-सचिन सपकळ, माजी सदस्या जिल्हा नियोजन समिती