पुणे – एरवी वाहनांच्या गर्दीने गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी आल्यानंतर चालणेही कठीण असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर आज पुणेकरांनी वाहनमुक्त आणि चालत मनमुराद खरेदीचा आनंद लुटला. सोबतच डीजेच्या ठेक्यावर नाचणारे लहान मुलं आणि महिला… मनोरंज़नासाठी असलेले खेळ आणि पादचार्यांबाबत जनजागृतीसाठी महापालिकेने घेतलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांंचा आनंदही पुणेकरांनी लुटला होता. निमित्त होते… महापालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या पादचारी दिनाचे.
महापालिकेकडून गेल्या तीन वर्षांपासून ११ डिसेंबर रोजी लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा केला जातो. या वर्षी मागील दोन वर्षांच्या तुलनेत या उपक्रमास अधिक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या निमित्ताने नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती या दरम्यान लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून तो केवळ पादचाऱ्यांसाठी खुला ठेवला होता. महापालिका, वाहतूक पोलिस आणि वाहतूक सुरक्षेवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा यामध्ये सहभाग होता.
मनसोक्त खरेदी आणि मनोरंजन
महापालिकेकडून संपूर्ण दिवसभर या पादचारी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी महापालिकेने शहरातील पथारी व्यावसायिक संघटनांचा सहभाग वाढवित ग्राहकांसाठी वेगवेगळे स्टाॅल उभारले होते. मात्र, शाळा तसेच महाविद्यालये सुरू असल्याने सकाळी नागरिकांची गर्दी पहायला मिळाली तर दुपारनंतर शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी होती. यावेळी नागरिकांसाठी सायकल, साप शिडी, कोडे, बास्केटबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन कॅरम यासह इतर खेळाचा लहान मोठ्यांसह सर्वांनी आनंद लुटला.
लहान मुलांसाठी खेळण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामध्ये लहान मुलांसाठीच्या तीनचाकी व दोन चाकी सायकल होत्या. या शिवाय मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये इ-स्कुटी सेवा सुरू होणार आहे. ही इ-स्कुटी कशी आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांनी घेतल्याचे दिसून आले. या शिवाय, अनेक विक्रेत्यांनी खेळांच्या स्पर्धा ठेवत विजेत्या नागरिकांंना सवलतीच्या दरात तसेच बक्षीस म्हणून कपडे तसेच इतर वापराचे साहित्य दिले. तर स्वयंसेवी संस्थाकडून या ठिकाणी वेगवेगळया जनजागृतीपर उपक्रम घेत नागरिकांना बक्षिसेही दिली. दरम्यान या वर्षी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने यंदा या उपक्रमास प्रतिसाद वाढला असल्याचे पहायला मिळाले.