पाबळच्या घाटातील घटना
शिक्रापूर – राज्यामध्ये सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली असताना अनेक दिग्गज नेते शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात गेल्याने अनेक घडामोडी घडत असताना नुकतेच शरद पवार यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेतलेली असताना थेट वळसे पाटील यांचे भाषण सुरु असताना शरद पवार समर्थकांनी शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्याने दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे भाषण आटोपते घेतले आहे.
पाबळ येथे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. सहकार मंत्री वळसे पाटील येथे उपस्थित राहून भाषण करत असताना वळसे पाटील पाण्याबाबत बोलत असताना त्यांची भूमिका मांडत होते. यावेळी त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे नाव घेतले असताना अचानक उपस्थित लोकांमधून शरद पवार समर्थकांनी शरद पवार यांच्या नावे घोषणा दिल्या.
मात्र, यावेळी वळसे पाटील यांनी अरे तुमचे जितके प्रेम शरद पवार साहेबांवर आहे. तितकेच प्रेम माझे शरद पवार साहेबांवर आहे, तेच प्रेम माझे त्यांच्यावर आहे, मी चाळीस वर्षे त्यांच्या सोबत राहिलेलो आहे,
काही राजकीय प्रश्न असतात. त्याबाबत मला काही खुलासा करायचा नाही. राजकीय सभेत राजकीय बोलू. मात्र आता आपण पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत मार्ग कसा काढायचा पाहू, असे बोलून भाषण आटोपते घेतले. मात्र, घडलेल्या घटनेमुळे शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.