जळोची : बारामतीचा विकासाचा पॅटर्न केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात पोहोचविण्यासारखे असे भव्य पोलीस उपमुख्यालय उभारण्यात आले आहे. बर्हाणपूर या गावाच्या हद्दीत 65 एकराच्या प्रशस्त परिसरात हे उपमुख्यालय बांधण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 15 हजार 659 चौ. मी.च्या जागेवर 32 हजार 785 चौ. मीटरमध्ये प्रशासकीय इमारत, पोलीस अधीक्षक निवासस्थान, उपअधीक्षक निवासस्थान, सायबर पोलीस ठाणे, विश्रामगृह, आर.पी.आय. इमारत, प्रशिक्षण केंद्र, बहुद्देशीय सभागृह, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, पोलीस अधिकारी कर्मचार्यांसाठीची निवासस्थाने, पोलीस मोटार ट्रान्सपोर्ट कार्यशाळा या इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
विद्या प्रतिष्ठान येथील मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे, ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते. बारामती तालुक्यातील बर्हाणपूर येथे नव्याने निर्मित पोलीस उपमुख्यालयाचे तसेच अन्य विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
याशिवाय दुसर्या टप्प्यात 4 हजार 802 चौ. मीटर बांधकाम क्षेत्रावरील कामे प्रगतीपथावर असून यात क्लब हाऊस, जलतरण तलाव, इन डोअर शूटिंग रेंज, उपहारगृह, शॉपिंग सेंटर, खेळाच्या मैदानात बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस लॉन, फुटबॉल मैदान, रनिंग ट्रॅक अशा सर्व मूलभूत आणि आधुनिक गरजेच्या सोई-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या एकूण प्रकल्पाचा खर्च 142 कोटी 62 लाख रुपये आहे. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात येणार्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाचा शुभारंभदेखील यावेळी करण्यात आल.
बारामती अपर अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन
बारामती येथे अपर अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटनदेखील यावेळी करण्यात आले. वाहतूक शाखा आणि शहर पोलीस ठाणे यांच्याकरीता नवीन प्रशासकीय इमारतीचे एकूण 14 हजार 62 चौ.मी. क्षेत्रफळात बांधकाम करण्यात आले आले. या कामाकरीता आतापर्यंत 27 कोटी 77 लाख रुपये खर्च आला आहे.
बारामतीच्या सौंदर्यात भर घालणारी पोलीस वसाहत
बारामती येथे पोलीस कर्मचार्यांसाठी 100 वर्षापूर्वीच्या जुन्या बैठ्या दगडी 75 निवासी खोल्या होत्या. त्या मोडखळीस आल्यामुळे तेथे 7 मजली 7 इमारती मूलभूत सोयीसुविधांसह बांधण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा 196 पोलीस कुटुंबीयांना होणार आहे. ही निवासस्थाने बैठकीची खोली, स्वयंपाकघर, दोन शयनगृहे आदी सुविधांसह आहेत.