पुणे – शहरासह जिल्ह्यातील काही भागात पुढील 24 तासात हलका पाऊस पडेल. त्यानंतर वाढलेल्या किमान तापमानात चार ते पाच अंशाने घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे 18 अंशांपर्यंत गेलेले किमान तापमान पुन्हा 12 ते 13 अंशांपर्यंत खाली येईल आणि आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे.
शनिवारी (दि. 2) शहरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि ऊन्हाचा लपंडाव सुरू होता. उपनगरासह जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता वाटत होती. तुरळक ठिकाणी भुरभुर पाऊस झाला. दरम्यान, पुढील 24 तासात तुरळक ठिकाणी अति हलका पाऊस पडेल, तर दि. 4 मार्चनंतर शहरातील आकाश निरभ्र राहील. पहाटे धुके पडेल तर किमान तापमानात चार ते पाच अंशांनी घट झाल्यामुळे रात्रीच्या थंडीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस
हवामानातील बदलामुळे राज्यातील कोकण-गोवा वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तासात मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी पडतील. धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भातील अकोल, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया येथे आज मेघगर्ज्नसेह पाऊस झाला. दि. 3 मार्चनंतर विदर्भ वगळता अन्य राज्यातील हवामान कोरडे राहील आणि किमान तापमानातही घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.