पेठ (प्रतिनिधी) – सातगाव पठार ता. आंबेगाव भागातील खाजगी दवाखाने नागरिकांच्या इतर आजारासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू ठेवावे, अशी मागणी सातगाव पठार भागातील नागरिकांनी केली आहे. कोरोना साथीचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याचे सरकारने आदेश दिले असले तरी अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात याव्यात, त्यात आरोग्य सेवा चालू ठेवणे बंधनकारक आहे.
पेठ येथील खाजगी डॉक्टर यांनी कोरोना व्हायरसमुळे आपले दवाखाने सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातगाव पठार येथील नागरिक अस्वस्थ झाले आहेत. पेठ येथील सहा खाजगी दवाखाने आहेत. सातगाव पठार भागातील सात गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सातगाव पठार भागातील नागरिकांना आपल्या आरोग्य सेवेसाठी मंचर ,राजगुरुनगर येथे जाणे शक्य नाही.
जमावबंदी लागू असल्याने एक गावातून दुसऱ्या गावात जाणे शक्य नाही. तरी पेठ येथील खाजगी दवाखान्यावर सात गावचे पेशंट अवलंबून आहेत. ऐनवेळी कुणाला जखम झाली,इतर आजार झाले तर डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजेत .जेव्हा खाजगी दवाखाने चालू राहतील, तेव्हा मेडिकल चालू राहतील. खाजगी दवाखाने बंद तर मेडिकल बंद राहतील. कोरोना साथीला हटविण्यासाठी सर्वांनी घराबाहेर पडू नये पण डॉक्टर यांनी आपले दवाखाने ओ पी डी नियमित चालू ठेवावी.
पेठ गावासह इतर कुरवंडी, कोल्हार वाडी, थुगाव, भावडी,कारेगाव ,पारगाव या इतर वाड्या वस्त्यांवर असलेल्या नागरिक यांना त्यांच्या विविध आजारांच्या समस्या निवारण करण्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तरी येथील खाजगी डॉक्टर यांनी आपले दवाखाने चालू ठेवावेत व पेठ येथील सर्व खाजगी डॉक्टर यांनी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत थांबण्याचा व ओ पी डी चालू ठेवण्याचा निर्णय बदलून सकाळी 10 ते सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत खाजगी दवाखाने चालू ठेवावेत असे आवाहन सातगाव पठार भागातील नागरिकांनी केले आहे.