‘कोरोना’नंतर चीनमध्ये आता ‘हंटा’ व्हायरस; नेटकरी संतापले

बीजिंग – चीन येथील वुहान प्रांतामध्ये उगम पावलेल्या कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले असतानाच आता चीनमध्ये एका नव्या विषाणूची चाहूल लागली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चीन येथील युनान प्रांतामध्ये एका नागरिकाचा ‘हंटा’ विषाणूच्या प्रादुर्भावाने मृत्यू झाला असून इतर ३२ लोकांना या विषाणूची लागण झाली असल्याची माहिती चीन येथील एका नामांकित वृत्तपत्राने दिली आहे. ‘हंटा’ विषाणूची लागण उंदरांच्या सातत्याने संपर्कात आल्यास अथवा त्यांच्या मांसाचे सेवन केल्याने होत असल्याचे समोर आले असून चीनमध्ये हा नवा विषाणू सापडल्याने समाज माध्यमांवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

‘हंटा’ विषाणू हा जीवघेणा असला तरी या विषाणूचा संसर्ग हवेतून होत नाही. मात्र जर ‘हंटा’ विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीच्या लघवी अथवा लाळेच्या संपर्कात आल्यास ‘हंटा’ची लागण होऊ शकते. याशिवाय ‘हंटा’ विषाणू बधिताने आपणास चावा घेतल्यास देखील या विषाणूची लागण होणे शक्य आहे.

दरम्यान, ट्विटर या समाज माध्यमावर #Hantavirus हा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंग झाला असून विविध विषाणूंचे माहेरघर ठरत असलेल्या चीनला नेटकरी दूषणे देताना दिसत आहेत. एका ट्विटर युजरने याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, ‘चीन येथील नागरिकांनी आता उंदीर, साप, वटवाघूळ यांसारख्या प्राण्यांचे सेवन करणे बंद करायला हवे’ असा मोलाचा सल्ला दिला आहे.

हंटा विषाणूची लक्षणं 

हंटाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, थंडी वाजून येणे आणि ओटीपोटात समस्या यासह थकवा, ताप आणि स्नायूंच्या वेदनांचा समावेश आहे. वेळीच उपचार न घेतल्यास ते खोकला आणि श्वास घेण्यास त्रासदायक ठरू शकते. या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 38 टक्के इतके आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.