14 महिला चालक
बारामती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो रोजगार मेळाव्यात येण्यास उशिर होणार होता. पोलिसांच्या ताफ्यात नवीन 39 गाड्या दाखल झाल्या आहेत. याचा शुभारंभ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून मी केला.
तिथे 39 वाहनांमध्ये जे चालक होते, त्याच्यात 14 महिला होत्या. सर्वांत चांगलं काम त्यांचे सुरू होते. महिलांना संधी देण्याचे काम महायुती सरकार करत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेत नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, देशात विदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत. त्या संधीचं सोनं करायचं आहे. आधीच्या बारामतीत आणि आताच्या बारामतीत मोठा फरक झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अजित पवारांनी बारामतीत झालेल्या बदलांची यादी वाचून दाखवली. आता राज्यातील सर्वांत मोठे बस स्थानक बारामतीत उभारले आहे. आज करोडो रूपयांची कामे पुर्णत्वाला जात आहेत. बारामतीचा कायापालट झाला आहे, असे ही अजित पवार यांनी नमूद केले.