वाघोली – जरांगे-पाटलांच्या मोर्चामुळे पुणे नगर रोडवरील वाहतुकीत मंगळवारी दुपारपासूनच मोठे बदल आले. बुधवारी (ता. 24 जानेवारी) मोर्चा नगर रोडवरून पुणे शहरामार्गे लोणावळ्याच्या दिशेने मार्गस्थ होईल.
मराठा समाजाचा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने मराठाबांधव सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी महामार्गासह काही रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोर्चा वाघोली येथे मुक्कामी असल्याने मंगळवारी दुपारपासूनच अहमदनगर येथे जाणारी वाहतूक वळविण्यात आली होती. हा मोर्चा 24 जानेवारीला पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधून पुढे जाणार आहे. त्यामुळे या दिवशी अहमदनगरकडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा येथून केसनंद, थेऊरमार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील.
वाघोली परिसरामधील वाहने वाघोली आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक-केशवनगर-मुंढवा चौक अशी वळविण्यात येणार आहेत. पुणे शहरामधून नगरकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, वाघोलीमार्गे नगरकडे असे जाता येईल. हा मोर्चा जसा पुढे जाईल, तसतशी वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे वाहतूक उपायुक्त बोराटे यांनी सांगितले.