पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने देशभरातील विविध केंद्रांवर २१ जानेवारी रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता (सीटीईटी) परीक्षा घेण्यात आली. आता या परीक्षेचा निकाल डिजीलॉकरवर अपलोड करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
डिजीलॉकरद्वारे सीटीईटी उमेदवारांना डिजिटल मार्कशीट आणि पात्रता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली आहे. ग्रीन इनिशिएटिव्ह’च्या दिशेने हा प्रयत्न आहे. या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांसाठी डिजीलॉकर खाती तयार करण्यात येणार आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकांद्वारे खाते ओळखपत्रे प्रदान केली जातील. उमेदवार दिलेली क्रेडेन्शियल्स वापरून त्यांची मार्कशीट, पात्रता प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार आहे.
आयटी कायद्यानुसार डिजिटल स्वाक्षरी केलेल्या मार्कशीट्स आणि पात्रता प्रमाणपत्रे कायदेशीररित्या वैध आहेत. परीक्षेशी संबंधित प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा समावेश करणे आणि पर्यावरण संरक्षण हे मंडळाने उचललेले एक भक्कम पाऊल आहे. मंडळ मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहे. कागद, झाडे आणि पाणी यासारख्या मौल्यवान संसाधनांची बचत करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे.
परीक्षेसाठी एकूण २६ लाख ९३ हजार ५२६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा देशभरातील १३५ शहरांमधील ३ ह्जार ४१८ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पेपर १ च्या परीक्षेसाठी एकूण ९ लाख ५८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. पेपर २ च्या परीक्षेसाठी १७ लाख ३५ हजार ३३३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. पेपर १ हा इयत्ता १ ली ते ५ वीच्या शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी पेपर २ हा इयत्ता ६ वी ते ८ वी च्या शिक्षकांच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी घेण्यात येत असतो.