जळोची – राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात आणि या अपघातामध्ये दर वर्षी अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत असतो. त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती मार्फत मंगळवारी (दि. 16) रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत रस्त्यावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीने ‘Walk on Right, Helmet/seat belt’ वापरणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर न करणे, वाहतुकीची चिन्हे, lane discipline, Good Samaritan याविषयी जनजागृती करण्यात आली.
समाजप्रबोधनाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकापर्यंत पोहचवण्याचे कार्य या माध्यमातून केले जाणार आहे. अपघातामधे मृत्युमुखी पडणार्या 80 टक्के लोकांचे वय हे साधारणपणे 18 ते 30 वयोगटातील असते. केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाज प्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी सांगितले.
या अभियानात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शाळा व कॉलेजेसमधून मुलांचे प्रबोधन करणे, वाहतुकीचे नियम व त्याचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे, शाळांमधील परिवहन समित्यांची बैठक घेणे, स्कूल बसेसची तपासणी करणे व मार्गदर्शन करणे यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे.
हेल्मेट वापरा संबंधीच्या व रस्त्यावर वाहन चालवताना रस्ता सुरक्षा वापरासंबंधीच्या आदेश देणारी चिन्हे व सावधानतेची व माहिती दर्शवणारी चिन्हे या बाबत अवगत् करण्यात आले. या प्रशिक्षणात ‘dynamix dairy’ चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच परिवहन कार्यालय बारामतीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
“नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये हेल्मेट आणि सिटबेल्ट यांची तपासणी करणे, अवैध प्रवासी वाहतूक रोखणे, गाडीची कागदपत्रे नसणे अशा वाहनचालंकावर कठोर कारवाई केली जाणार आहे.” – राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
शरद पवारांकडून कौतुक
बारामतीतील डायनामिक्स डेअरी कंपनीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 15) दुपारी तीन वाजता रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम पार पाडला. यावेळी पवारांनी काम चांगले करत आहात असे म्हणत यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित कर्मचार्यांना परिवहन माहिती पुस्तकाचे वाटप करण्यात आले. व रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती दिली. यावेळी मोटर वाहन निरीक्षक निरंजन पुनसे, बजरंग कोरावले, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ऋषिकेश हांगे, प्रियांका कुडले, प्रज्ञा ओंबासे उपस्थित होते.