पळसदेव: मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापल्याचे मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, आता फक्त मराठा आरक्षण लक्ष. अशा पद्धतीचा मजकूर असलेला बॅनर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या मुख्य कमानीजवळ लावण्यात आले आहेत.
यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही आशय घोषणा देत काल रात्री दहा वाजेपर्यंत गावाच्या मुख्य कमानीजवळ सकल मराठा समाजाच्या युवकांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं.
पळसदेवमधील मराठा समाजाच्या बांधवांनी आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सलाटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार पळसदेव मधील मराठा समाजा बांधवांनी सर्वच पक्षातील नेत्यांना गाव बंदीचा निर्णय घेतला. हे आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. रात्री तब्बल दहापर्यंत शेकडो आंदोलकांनी गावातील प्रवेशद्वारावर थांबून गावात येणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात येण्यास विरोध दर्शविला.
पळसदेव गावात गुरुवारी (दि. 14) दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार होती; मात्र मराठा समाजाच्या युवकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या नेत्यांनी संबंधित कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी फोन करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती प्रवीण माने कार्यक्रमाला आले असता मराठा समाजच्या युवकांच्या विनंतीनुसार माने यांनी गावात प्रवेश केला नाही.
प्रवीण माने यांना अडवले
प्रवीण माने यांना गावाच्या कमानीजवळ अडवण्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री दहा वाजेपर्यंत मराठा आंदोलक गावच्या मुख्य कमानीजवळ तळ ठोकून होते. पुढारी बंद आंदोलनाची परिस्थिती पाहता इंदापूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र शांततेच्या मार्गाने मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित झाले होते. यापुढे एक महिनाभर विविध मार्गाने आंदोलन सुरु ठेण्यासाठी रविवारी पुन्हा सकल मराठा समाजच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सकल मराठा समाज संयोजकांनी दिली.