लोणी काळभोर : तरडे (ता. हवेली) येथे कुटुंब झोपेत असल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील रोख रकमेसह पावणेचार लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना तरडे ग्रामपंचायत हद्दीतील जगताप मळा परिसरात मध्यरात्री घडली आहे.
याप्रकरणी वैभव जगताप (वय 31, रा. तरडे, जगताप मळा) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव जगताप हे तरडे येथील जगतापमळा परिसरात कुटुंबासोबत राहतात. जगताप हे शनिवारी रात्री कुटुंबासोबत घरी झोपले होते.
तेव्हा अज्ञात चोरट्यांनी जगताप यांच्या घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले रोख रक्कम 47 हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 65 हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी दि. 6) मध्यरात्री दोन ते पहाटे साडे पाच या दरम्यान घडली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.