रायपूर – छत्तीसगडचे मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांच्या पत्नीच्या नावावर महासमुंद जिल्ह्यात सरकारच्या एका विभागाच्या नावावर असलेली जमीन खरेदी केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी विरोधी काँग्रेस पक्षाने केली आहे.
ब्रिजमोहन अग्रवाल हे रायपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावे करण्यात आलेला हा जमीन खरेदी करार कोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. या मागणीवर अग्रवाल यांनी कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.
न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दीपक बैज यांनी रविवारी दावा केला की अग्रवाल यांनी फसवणूक करून राज्य जलसंपदा विभागाची मालमत्ता त्यांच्या पत्नीच्या नावावर मिळवली आणि तेथे रिसॉर्ट बांधले.
ही जमीन तुमगाव तहसील अंतर्गत असलेल्या जळकी गावात सिरपूर जवळ आहे येथून जवळच एक ऐतिहासिक बौद्ध स्थळ आहे. २३ एप्रिल रोजीच्या आपल्या आदेशात, महासमुंदचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशयांनी संबंधित जमिनीची विक्री करार रद्द केला.