* प्रचाराची राळ आज थंडावणार
* काका विरुद्ध पुतण्या या संघर्षाची किनार
* नणंद विरुद्ध भावजयमध्ये तुल्यबळ लढत
रोहन मुजूमदार
पुणे – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभेत सध्या जोरदार प्रचार सुरू असून ही प्रचाराची राळ रविवारी (दि. 5) सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहे. दरम्यान, तुतारी वाजवणारा माणूस की घड्याळ बाजी मारणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियासह चौक, पारा, चहा, शितपेयांची ठिकाणे, बस स्थानक, पानटपरीवर रंगल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांच्या कुटुंबात पडलेल्या फुटीनंतर होत असलेल्या पहिल्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून (महाविकास आघाडी) सुप्रिया सुळे निवडणुकीत रिंगणात आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (महायुती) सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. नणंद विरुद्ध भावजय या लढतीला काका विरुद्ध पुतण्या या संघर्षाचीही किनार आहे.
महायुती, तसेच महाविकासआघाडीत फाटाफूट झाल्याने बारामती प्रचाराची राळ उडवण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांना चांगलीच धावाधाव करावी लागली. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागली. कधी नव्हे ते यंदा (पवार कुटुंबातीलच लढाई असल्याने) बारामती लोकसभा निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अपक्षांचा प्रचार त्यांच्या कुवतीनुसार सुरू आहे. विरोधी उमेदवारांची मते खाणार्या अपक्षाला बळ देण्याचे प्रयत्नही तुल्यबळाकडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी मतदान
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि. 7) मतदान होणार आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावतील. अधिकृत प्रचार संपल्यानंतर बारामती, दौंड, इंदापूर, खडकवासला, पुरंदर-हवेली, भोर-राजगड-मुळशी या सहा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून वैयक्तिक गाठीभेटी घेऊन प्रचाराला जोर येणार आहे.
सांगता सभेद्वारे बारामती आज तोफ धडाडणार
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची प्रचार सांगता सभा रविवारी (दि. 5) दुपारी एक वाजता जुना मोरगाव-बारामती रस्त्यावर लेंडी पट्टी येथे होणार असून शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची सांगता सभा दुपारी दोन वाजता टीसी कॉलेज रोडवरील मिशन ग्राउंडवर होणार आहे. या सभेत अजित पवारांची तोफ धडाडणार आहे. दरम्यान, काका-पुतणे शेवटच्या क्षणी प्रचाराद्वारे काय बोलणार? आणि कोणकोणाला क्लिन बोल्ड करणार हे प्रचार सभा संपल्यानंतर स्पष्ट होईलच.
आज, उद्याची कत्तल की रात
रविवारी सायंकाळपर्यंतचा वेळ जाहीर प्रचारासाठी हाती आहे. त्यानंतर रात्री साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर होण्याची शक्यता आहे. निवडणूक यंत्रणेला चकवा देऊन मते पक्की करण्यासाठीच्या घडामोडी या काळात होतील. त्यासाठी काही उमेदवारांनी खास कार्यकर्त्यांची फळी उभारली असल्याचीही चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघात रंगली आहे.