पुणे – नॅशनल अॅक्रीडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅण्ड कॅलीब्रेशन लॅबने (एनएबीएल) अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयच्या सिव्हील इंजिनीअरिंग विभागातील मटेरीअल टेस्टिंग लॅब व एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग लॅबला मान्यता दिली. बांधकाम व्यवसायातील कामाची गुणवत्ता व सुरक्षितता पडताळण्यासाठी ही लॅब महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सिव्हील इंजिनीअरिंगसाठी आवश्यक बांधकाम, विटा, स्टील, काँक्रीट ब्लॉक इत्यादी अनेक बांधकाम साहित्यावर गुणवत्तेच्या विविध चाचण्या करण्यात येतात. त्यामुळे बांधकाम व्यवसायातील कामाची गुणवत्ता व सुरक्षितता पडताळण्यासाठी एनएबीएलच्या मानकांचे पालन करावे लागते. बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांकडून आपल्या कॉंन्क्रिट व स्टील स्ट्रक्चरची पडताळणी करण्यासाठी या लॅबचा उपयोग होणार आहे. बांधकाम क्षेत्रास आवश्यक असणारी जमीन, माती, मुरूम यांची गुणवत्ता, शिवाय जमिनीखालील विविध चाचण्या करण्याची क्षमता या लॅबमध्ये असल्याने मटेरिअल टेस्टिंग लॅबला मानांकन मिळाले.
मटेरिअल अँड टेस्टिंग लॅबची मान्यता सिव्हील इंजिनीअरिंग क्षेत्रात क्रांती घडवेल, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे यांनी व्यक्त केले. प्रा.सागर गावंडे व डॉ.अभय शेलार, प्रा.सचिन यादव यांचेसह संपूर्ण स्थापत्य अभियांत्रिकीच्या टीमने एन.ए.बी.एल मान्यता मिळविण्यासाठी परिश्रम घेतले.