11-2 च्या फरकाने विजयी
लोणी काळभोर – येथील विशे कंम्पोनंट्स कंपनीतील कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कामगार विकास पॅनलने 11-2 च्या फरकाने बाजी मारली असून कामगार संघर्ष पॅनलला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
येथील एंजल हायस्कूलमध्ये कामगार संघटनेची 2024-26 ची त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. किशोर बालीगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणूक केंद्रावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण धायगुडे, हवालदार रामदास मेमाणे व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
लोणी काळभोर येथील विशे कंपोनंटस कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही कामगार संघटना कार्यरत आहे. कामगार विकास पॅनलनेचे चिन्ह पेन होते. तर कामगार संघर्ष पॅनलचे चिन्ह कप बशी होती. विशे कंपनीत 272 कामगार सभासद आहेत. या निवडणूक प्रक्रियेत दोन्ही संघटनेकडून प्रत्येकी 13 जणांचे अर्ज आले होते. तर एका सभासदाने अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. एकूण 27 उमेदवार रिंगणात उतरले होते.
या निवडणुकीमध्ये कामगारांनी कामगार विकास पॅनलच्या पारड्यामध्ये मतदान करून निवडून दिले. कामगार विकास पॅनलने 13 पैकी 11 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. तर कामगार संघर्ष पॅनलला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. निकालानंतर कामगारांनी गुलाल उधळून, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये विजयोत्सव साजरा केला.
विजयी उमेदवार
कामगार विकास पॅनेल ः किशोर रघुनाथ तांबे, सचिन बळवंत काळभोर, हेमंत बबन कादवाने, सागर दगडूराम काळभोर, सचिन किसन चांदगुडे, चक्रवर्ती उर्फ शंकर तुकाराम मुरकुटे, सचिन भगवान काळभोर, दत्तात्रय तानाजी डिंबळे, सचिन दत्तात्रय थोरात, योगेश बाजीराव देसाई, महेश हरिभाऊ सपकाळ. कामगार संघर्ष पॅनेल – चंद्रशेखर नारायण देशमुख, अमित वसंत कदम.