राजगुरूनगर– राज्यातील 65 हजार शाळाचे खासगीकरण होणार आहे. शिक्षकांनी वेळीच जागृत राहावे, अन्यथा भविष्यात शिक्षकांना याचे परिणामाला सामोरे जावे लागेल, असे सूचक वक्तव्य आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. खेड पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित 2020-21 ते 2023- 24 या कालावधीतील 225 गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन राजगुरूनगर येथे शनिवारी (दि. 3) करण्यात आले होते. त्यावेळी आमदार मोहिते बोलत होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी जीवन कोकणे, पदवीधर शिक्षक, केंद्र सभा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम चेहेरे, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश कांबळे, खेड तालुका माजी अध्यक्ष धर्मराज पवळे, नंदा पवार, श्रीरंग चिमटे,आदर्श शिक्षक संदीप जाधव, रोहिदास रामाने, संजय राळें, नारायण करपे, तानाजी म्हाळुंगकर, दत्तात्रय गोसावी आदींसह पुरस्कार विजेते शिक्षक त्यांच्या परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, शिक्षकांनी आपल्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांना देत मनसोक्त आनंदाने जीवन जगले पाहिजे. जगात घड्याळाच्या काट्याप्रमाणे टेक्नॉलॉजी येत आहे. ती जितकी झपाट्याने वाढत आहे तितक्याच वेगाने आपले हात रिकामे होत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी किती ज्ञान द्यायचे हे ठरवणे गरजेचे आहे. शिक्षकांनी एकमेकांतील हेवेदावे विसरावेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन तुकाराम वाटेकर, विशाल शिंदे, वर्षा वाटेकर यांनी तर विस्तार अधिकारी जीवन कोकणे यांनी आभार मानले.
तर आरक्षणाचा फायदा काय?
शिक्षण क्षेत्रातही खासगीकरण येणार असल्याने सध्या राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाचा फायदा काय होणार याकडे विचार पूर्वक लक्ष देणे आवश्यक असल्याचे आमदार मोहिते यांनी नमूद केले.
गटशिक्षणाधिकारी जंगले यांची कानउघाडणी
शिक्षक अधिकारी यांच्यात चांगली नाळ जुळली पाहिजे.आधीच्या अधिकार्यांनी शिक्षकांशी चांगले संबंध ठेवले होते. गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांना तसे चांगले जमत नाही असे दिसून येत आहे. शिक्षकांच्या शुल्लक चुकीसाठी थेट कायद्यावर बोट ठेवू नका.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक काळात अनेक शिक्षकांच्या सेवा पुस्तकावर मारलेले शेरे मागे घेण्यात यावेत.
शिक्षक-अधिकार्यांमध्ये संवाद ठेवावा. शिक्षकांना कायद्याचा नव्हे तर आपुलकीचा धाक ठेवून चांगले वातावरण निर्माण करावे, अशा खोचक शब्दात गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांची आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कानउघाडणी केली.