पुणे – पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या 38 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर.व्ही. अदोणे यांनी सुनावली. दंडातील सात हजार रुपये आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मनौधौर्य योजनेनुसार जेवढी शक्य आहे, तेवढी मदत पीडितेला द्यावी, असेही न्यायालयाने आदेशत म्हटले आहे.
संभाजी दशरथ जाधव (रा. कुसगाव, मावळ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने तळेगाव दाभाडे पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 31 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित, तिची आई आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष महत्त्वाची ठरली.
पोलीस उपनिरीक्षक ए.एम.लांडगे यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून कुंदा गावडे यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना पोलीस कॉन्स्टेबल नितीन पवार यांनी मदत केली. पीडित अंगणात खेळत होती. त्यावेळी जाधव याने तिला उचलून शेतात नेले. तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर ही घटना गंभीर स्वरूपाची असून, आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. लीना पाठक यांनी केली. यावर सुनावणी करत न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमानुसार शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.