पुणे – सायबर भामट्यांनी फेसबुक व इतर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. नोकरीचे आमिष, आकर्षक जाहिराती आणि ऑफरच्या जाळ्यात नागरिकांना अडकवले जात आहे.
नागरिकांचा विश्वास संपादन करुन काही सेकंदात त्यांचे बॅंक खाते साफ केले जात आहे. मात्र आता सायबर पोलिसही सायबर भामट्यांना चेकमेट देण्यास सरसावरले आहेत.नागरिकांनी गोल्डन हावर्समध्ये तक्रार केली तर त्याचे पैसे पुन्हा मिळवून दिले जात आहेत. फसल्या गेलेल्या एका व्यक्तीला सायबर पोलिसांनी त्याचे तीन लाख रुपये पुन्हा मिळवून दिले आहेत.
नोकरीचे अमिष देवुन ऑनलाईन 10 रुपयांचे ट्रान्झंक्शन करायला सांगुन 3 लाख 7 हजार 217 रुपयांची फसवणुक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांचे तत्परतेमुळे फिर्यादीला पुर्णपणे रक्कम परत मिळवुन देण्यात आली.
फिर्यादीला दिनांक 7 जूलै रोजी मोबाईलवर आरोपीने (अज्ञात) व्यक्तीने फोन करुन दुबई येथील जुलेखा हॉस्पीटल येथे जॉब लावुन देतो असे सांगत एक ऑनलाईन फार्म भरायला लावला. त्यांनतर सुरुवातीला रजिस्ट्रेशन फी म्हणुन 10 रुपये भरावे लागतील असे सांगुन मोबाईलवर एक लिंक पाठविली. फिर्यादी यांनी 10 रुपये रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर फिर्यादी यांचे डेबिट कार्ड व्दारे एकुण 3 लाख 7 हजार 217 रुपयांचे ट्रान्झेक्शन झाले.
लक्षात आल्याने फिर्यादी तक्रार देण्यासाठी तात्काळ सायबर पोलीस स्टेशनला येताच सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी सदरचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मिळालेल्या माहीतीवरुन वेगवेगळ्या 2 पेमेंट मर्चट यांचेशी विनाविलंब पत्रव्यवहार करुन संबंधीत पेमेंट मर्चटचे नोडल ऑफीसर यांचेशी संपर्क साधुन फिर्यादीचे अकाऊंडवरुन झालेले फ्रॉड ट्रान्झेक्शन थांबविणेबाबत कळविले. सदरचे पेमेंट मर्चट यांनी पोलीसांना तात्काळ प्रतिसाद दिल्याने फिर्यादी यांचे अकाऊंट मधुन गेलेले पैसे पुन्हा फिर्यादीचे अकाऊंटमध्ये
वळविण्यात पोलीसांना यश आले.
सदरची कामगिरी ही उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस अंमलदार उमा पालवे, पुजा मांदळे यांनी केली आहे.