लंडन – इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज होत असलेल्या भारतीय क्रिकेट संघासमोर कामगिरीपेक्षा करोनाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. इंग्लंडची श्रीलंका व पाकिस्तान यांच्याशी झालेली मालिका देखील करोनाच्या सावटाखाली खेळली गेली. इतकेच नाही तर काउंटी स्पर्धेतील काही खेळाडूंनाही बाधा झाल्याचे समोर आल्यामुळे आता भारत व इंग्लंड यांच्यातील मालिकेवरही स्थगितीचे ढग जमा होऊ लागले आहेत.
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून करोनाचा धोका असून इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्येही करोनाने एन्ट्री केली आहे. डर्बीशायर आणि एसेक्स यांच्यात सुरू असलेला सामना एका खेळाडूची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे रद्द करण्यात आला. भारतीय संघाचा ऑफ स्पिन गोलंदाज रवीचंद्रन अश्विनही सरे संघाकडून काऊंटीमध्ये खेळत असल्याने भारतीय संघाची चिंताही वाढली आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर असलेला पीटर हॅंड्सकॉम्बलाही करोना झाल्यामुळे त्याने काउंटीतून माघार घेतली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी इंग्लंड संघातील 7 जणांना करोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना संपूर्ण संघच बदलावा लागला. इंग्लंड दौऱ्यावररून मायदेशी परतलेल्या श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅंट फ्लॉवर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील एका व्यक्तीलाही करोना झाल्यामुळे भारताच्या दुसऱ्या संघाच्याही चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे भारत व श्रीलंका यांच्यातील मालिकाही काही दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.
काऊंटी क्रिकेटमध्ये करोनाची एन्ट्री झालेली असताना भारत व इंग्लंड मालिकेवरही करोनाचे सावट निर्माण झाले आहे. येत्या 4 ऑगस्टपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होत आहे. भारतीय संघाचे खेळाडू सध्या बायोबबलमध्ये नसून सुट्टीचा आनंद घेत आहेत. ते बायोबबलमध्ये लवकरच परतणार असून तो कालावधी पूर्ण केल्यावरच ही मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, पुढील काही दिवसांत करोनाची परिस्थिती कशी राहील याचा आढावा घेतल्यावरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने सांगितले आहे.