पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका 12 वर्षाच्या मुलाचे 70 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. यामुलाची भारती विद्यापीठ पोलिसांनी 6 तासाच्या आत कास पठारावरील जंगलातून सुखरुप सुटका केली. दरम्यान मुलाला आरोपींनी मारहाण केल्याचे उघड झाले आहे. अपहरण करणारा हा त्यांचा भाडेकरुच निघाला.
विराज अमोल भिलारे (12, रा.भिलारेवाडी, कात्रज) असे सुटका करण्यात आलेल्या मुलाचे नावाचे आहे. याप्रकरणी मुलाचे चुलते अमित भिलारे(42) यांनी तक्रार दाखल केली होती. भिलारे बंधुंचा दुधाचा व्यवसाय आहे. याप्रकरणी राजेश शेलार नावाच्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, भिलारे कुटूंब घरोघरी दुधाची डिलिव्हरी करतात. त्यांनी नुकतेच 17 गुंठे जागेचे प्लॉटींगचे काम सुरु केले होते. तर घराच्या बाजुला एका पत्रा शेडमध्ये राजेश शेलार आणि समीर शेलार यांना फॅब्रिकेशनच्या व्यवसायासाठी जागा भाड्याने दिली आहे. अमोल यांचा मुलगा विराज हा सायंकाळी उशीरापर्यंत घरी न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. तेव्हा नात्यातील एका मुलाने विराज हा राजेश शेलारच्या कारमध्ये बसून गेल्याचे सांगितले. कुटूंबाने राजेशला फोन लावला असता, तो बंद आढळला.
दरम्यान राजेशच्या फोनवरु एका व्यक्तीचा फोन आला. त्याने राजेशचा खून केला असून तुमच्या मुलालाही मारुन टाकले जाईल. त्याचा जीव वाचवायचा असेल तर तातडीने 70 लाख रुपये घेऊन या अशी धमकी दिली. मात्र इतके पैसे नसल्याचे सांगितल्यावर समोरील व्यक्तींने शिवीगाळ करत फोन बंद केला.
दरम्यान पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे पहाटे कुटूंबाने थोड्याफार पैशाची व्यवस्था केली असल्याचे आरोपीला सांगितले. त्यानूसार मुलाच्या पालकांना पैसे घेऊन पाठवण्यात आले. दरम्यान आरोपी सातारा येथील कास पठारावरील जंगलात असल्याचे समजले. यामुळे स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलिसांनी संपुर्ण डोंगर परीसर पिंजुन काढला. मात्र आरोपींना पोलीस आल्याची चाहुल लागल्याने त्यांनी मुलास डोंगरात अंधारामध्ये सोडून जंगलात पळ काढला. मुलाला शोधून सुखरुप ताब्यात घेण्यात आले. आरोपी फरार असुन त्याचा पोलीस पथके शोध घेत आहेत.
ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक मंगल मोडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, गुन्हे शाखाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या पथकाने केली.