हिंगोली – माजीमंत्री, काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचे १८ फेब्रुवारी रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी रात्री उपचारादरम्यान नांदेड येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. १९ फेब्रुवारी दुपारी बारा वाजेदरम्यान त्यांच्या पार्थिवावर कळमनुरी शहरातील विकासनगर येथे साश्रुनयनाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नातू पुष्कराज सातव याने त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला.
यावेळी पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. रजनीताई सातव यांच्या निधनाने काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. एक धाडसी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केली.
काँग्रेस पक्षात ज्येष्ठ नेत्या म्हणून काम करत असताना त्यांनी आपले चिरंजीव दिवंगत राजीव सातव यांना संघटनेच्या कामात सक्रिय केलेले होते. त्याचबरोबर आता त्यांची सून आमदार प्रज्ञाताई सातव यादेखील काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत.
सातव घराणे मागील ४३ वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत. गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणूनही सातव कुटुंबाला ओळखले जाते. माजी राज्यमंत्री रजनीताई सातव यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये एक वेळेस विधानसभा आणि एकदा विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय त्यांनी आरोग्य राज्यमंत्रीपद देखील भूषवलेले होते. काँग्रेसमध्ये प्रदेश संघटनेत त्यांनी अनेक वर्षे काम केले होते.
अंत्यसंस्काराच्यावेळी खा. हेमंत पाटील, माजी खासदार शिवाजी माने, आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजीमंत्री सूर्यकांता पाटील, माजीमंत्री माधवराव किन्हाळकर, माजी आ. आमदार डॉ. संतोष टारफे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आमदार विजय खडसे, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, नागेश पाटील आष्टीकर, बाळासाहेब देशमुख, दिलीप चव्हाण, बी. डी. बांगर, गोपू पाटील, दिलीप देसाई, सचिन नाईक, जकी कुरेशी, डॉ. बी. डी. चव्हाण, डॉ. दिलीप मस्के, संजय बोंढारे, नेहाल भैय्या, श्रीकांत.पाटील, अजित मगर, बाळासाहेब मगर, शिवाजी शिंदे, बाळासाहेब देशमुख, डॉ. एल. डी. कदम, बाबा नाईक, मुनीर पटेल, चंद्रकांत देशमुख, भागवत चव्हाण, नंदकिशोर तोष्णीवाल, सुधीर सराफ, अ. हफीज अ. रहेमान, शिवा घुगे, प्राचार्य बबन पवार, विनोद बांगर आदींसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.