पुणे – खडमाळअळी परिसरातील घोरपडी पेठेत गुरुवारी दुपारी घरफोडीचा मोठा थरार घडला. घरात घुसलेल्या गुन्हेगाराने प्रतिकार करणाऱ्या घरमालकावर पिस्तूलातून दोन गोळ्यांच्या फैरी झाडल्या. त्यानंतरही घरमालकाने धाडस दाखवत गुन्हेगाराला पकडून ठेवले. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत आरोपीला जेरबंद केले. सुदैवाने घटनेत घरमालकाला किरकोळ जखम झाली.
याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.त्याच्याबरोबरची महिला साथीदार मात्र फरार झाली आहे.
आरोपीचे नाव विठ्ठल वामन भोळे (मुळ जळगाव, सध्या रा.हडपसर ) असे आहे. तर आवेज सलीम अन्सारी (23) असे धाडसी घरमालकाचे नाव आहे. त्याला रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड यांनी धाडस दाखवून सहकार्य केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आवेज अन्सारी कुटूंबाचे शहरात दोन तीन ठिकाणी व्यवसाय आहेत. बालाजीनगर येथे स्नॅकचा व्यवसाय आहे. त्याचे कुटूंब बाहेरगावी गेले होते. यामुळे दुपारी एकच्या सुमारास तो स्नॅक घेऊन घरी आला होता. तो रहात असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर नाष्टा करत असताना, त्याला खालच्या मजल्यावर काही हालचाल सुरु असल्याचा आवाज आला. त्यामुळे तो तातडीने खाली असता त्याला आरोपी भोळे हा बॅगेत काहीतरी भरत असल्याचे दिसले. त्याच्या घरात यापुर्वी चोरी झाल्याने, यावेळी सावध होत आवेजने भोळेला पकडले. मात्र भोळेने आक्रमत होत, त्याला ढकलून देत खिशातून पिस्तूल काढले. याही परिस्थितीत आवेजने भोळेला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र भोळेने त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या.
आवेज बालंबाल बजावला गेला. मात्र गोळ्यांचा आवाज ऐकत रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड तेथे धावत आले. त्यांनी तातडीने आवेजला सहकार्य करत भोळाला पकडले. यानंतर इतरही काही नागरिक जमा झाले. त्यांनी भोलाला पकडून ठेवत पोलिसांना पाचारण केले. दरम्यान आवेजच्या हाताला झटापटीत जखम झाली होती. पोलिसांनी तातडीने भोळेला ताब्यात घेत पिस्तूल हस्तगत केले. भोळे सोबत एक महिलाही होती. ती या गडबडीत कटावणी घेऊन पळून गेली. तीचाही पोलीस शोध घेत आहेत.
आवेजच्या हिम्म्तला दाद …..
इमारतीत आमचे दोन फ्लॅट आहेत. मी खालच्या फ्लॅटवर आल्यावर त्याने पिस्तूल काढली. मात्र मी विरोध करताच,त्याने चाकूनेही वार केला. मी तो चुकवल्याने, त्याने पिस्तूलातून तीन गोळ्या झाडल्या. मात्र मी हिम्मत दाखवत त्याला विरोध केला – आवेद अन्सारी