पुणे – एकत्र कुटुंबातुन विभक्त राहण्याचा अट्टाहास धरणार्या पत्नीसह तिचे आई-वडील व भावाकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि सातत्याने होणार्या मानसिक त्रासाला कंटाळून जावयाने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. शरद नरेंद्र भोसले (वय.40,रा. दौलतनगर सोसासयटी धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटना मंगळवारी धनकवडी येथे घडली.
याप्रकरणी पत्नी प्रियंका शरद भोसले (वय.28), मेव्हणा मनिष उर्फ गणेश शंकर शिंदे (वय.27),सासरे शंकर शिंदे (वय.56), सासू रोहीणी शंकर शिंदे (वय.50,राहणार सर्व कवडीपाट लोणीकाळभोर) यांच्या विरुद्ध सहकारनगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वडील नरेंद्र दत्तात्रय भोसले (वय.58,रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद भोसले यांचे धनकवडी येथे हॉटेल होते. त्यांचा 2017 मध्ये प्रियांकाशी विवाह झाला होता. ते पत्नी, मुलगी व आई-वडीलांसह धनकवडीमध्ये राहात होते. पत्नी प्रियांका हि तिच्या आई- वडीलांच्या सांगण्यावरुन पतीच्या कुटुंबापासून वेगळे राहण्यासाठी तगादा लावत होती. त्यावरुन त्यांच्यात सातत्याने भांडणे सुरू होती. दरम्यान, पत्नीने या प्रकाराबाबत तिचा भाऊ गणेशला सांगितले. गणेशने भांडणे मिटविण्यासाठी भोसले यांना मार्केट यार्ड येथे बोलावले. त्यानंतर त्यांना तेथे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंत गणेशने पुन्हा शरद व त्यांच्या वडीलांना हडपसर येथील हांडेवाडी परिसरात बोलावून दोघांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली होती.
या सगळ्या मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून शरद भोसले यांनी त्यांच्या धनकवडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी, सासु-सासरा व तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.