पुणे – डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवत त्यांना घेराव घातला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर गेल्या काही दिवसांपासून डीएड आणि बीएडचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून या भरतीतील इंग्रजी माध्यमांचे स्वतंत्र आरक्षण रद्द करावे आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली. या मागण्याचे निवेदन देण्यासाठी आंदोलक विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवली. विद्यार्थ्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. चंद्रकांत पाटील हे शिक्षण आयुक्तालयात काही कामा निमित्त आले होते.
इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र आरक्षणामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असुन हा अन्याय दूर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्य शासनातील एक मंत्री म्हणून विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला.
या विद्यार्थ्यांशी संवाद साध्यण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला. विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांची गाडी पुढे सोडण्यात आली.