पुणे – प्रायोगिक रंगभूमीचे अवकाश विस्तारत नवा आयाम देणाऱ्या पुण्यातील श्रीराम लागू रंग-अवकाश या प्रकल्पाची उभारणी आता पूर्ण झाली आहे. रंगकर्मींच्या कलाविष्कारासाठी हा समीप रंगमंच सज्ज झाला आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू परिवार यांच्या वतीने ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या इमारतीत साकारण्यात आलेल्या श्रीराम लागू रंग–अवकाशचे गुरुवारी (१८ जानेवारी) ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सेंटरचे सचिव राजेश देशमुख, खजिनदार शुभांगी दामले, प्रकल्पाचे वास्तुविशारद माधव हुंडेकर, आरती मोरवेकर या वेळी उपस्थित होत्या. हे अवकाश पाहून मला हॉलंडमध्ये झालेल्या ‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगाची आठवण झाली. मी आजवर जगभरात अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोग केले आहेत.
माझ्या या नाट्यक्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवानंतर या ठिकाणी असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधा, आरामदायी आसनव्यवस्था आणि रंगमंचीय व्यवस्थेत मिळणारी मोकळीक विशेष आहे असे मला वाटते, अशी जागा आज पुण्यात उभी होत असल्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. प्रायोगिक रंभूमीवरील अनौपचारिक शिक्षणात ही जागा भविष्यात मोलाचा वाटा उचलेल असा मला विश्वास आहे, अशा भावना डॉ. आगाशे यांनी व्यक्त केल्या.
बदलत्या काळानुसार नाटकाची परिभाषा, प्रायोगिक रंगभूमी या सर्वच गोष्टी बदलत आहेत. हे होत असताना दिग्दर्शक आणि कलाकार नाटके सादर करताना रसिकांसमोर आपला विषय पोहोचण्याचा, त्यांच्या अधिकाधिक जवळ येण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे सांगून देशमुख यांनी सभागृहाची रचना कशी आहे ते सांगितले.
“या रंग अवकाशाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस एक विशेष गॅलरी उभारण्यात येईल. यामध्ये डॉ. लागू यांना मिळालेली पारितोषिके, त्यांनी काम केलेल्या शंभरहून अधिक नाटकांची सूची, दृक-श्राव्य माध्यमातून डॉ. लागू याविषयीची काही माहिती आणि नजीकच्या भविष्यात त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांची छायाचित्रे यांचा समावेश करण्यात येणार आहे.” – माधव हुंडेकर, वास्तुविशारद