पुणे – राज्यातील जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सुटीच्या कालावधीत देखील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
राज्यातील तालुक्यांमध्ये माहे जून ते सप्टेंबर कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांमध्ये शासन निर्णयाद्वारे दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या भागासाठी शासनाने विविध सवलती लागू केलेल्या आहेत. दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांतील शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजना (पीएम- पोषण योजना) दीर्घ सुटीच्या कालावधीत देखील राबविण्यात येणार आहे. शासन निर्णयान्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना तसे निर्देश दिले आहेत.