पुणे: यजमान एसएनबीपी अकादमीसह पुणे आणि औरंगाबाद संघांनी सहज विजय मिळवून येथे सुरू असलेल्या महिलांच्या दुसऱ्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर सुरू आहे.
एसएनबीपी अकादमी संघाने कर्णधार इस्थर पांडे हिने नोंदविलेल्या तीन गोलच्या जोरावर जालना संघाचा 5-0 असा पराभव केला. तिला यज्ञा सांगळे आणि आयेशा खान या दोघींनी एकेक गोल करत सुरेख साथ केली.
दुसऱ्या सामन्यात पुणे संघाने अर्धा डझन गोल करत जळगावचा 6-1 असा पराभव केला. पुणे संघाची पूजा शेंडगे हिची कामगिरी निर्णायक ठरली. तिने चार गोल केले व अन्य दोन गोल स्वाती जाधव आणि श्रद्धा तिवारी यांनी केले.
पराभूत जळगाव संघाकडून एकमात्र गोल पूजा मोहरकर हिने केला. काजल आटपाटकर आणि गौरी मकाने या दोघींनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर औरंगाबाद संघाने कोल्हापूर संघाचा 2-0 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात नाशिकला सातारा संघाकडून पुढे चाल मिळाली.