नवी दिल्ली – बदनामीच्या दोन खटल्यांच्या सुनावणीसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी उद्या आणि परवा (दि. 10 आणि 11) गुजरातमध्ये उपस्थित रहणार आहेत. “सर्व चोरांची नावे मोदी कशी असू शकतात.’असे लोकसभेच्या प्रचारादरम्यान ते म्हणाले होते. त्या संदर्भातील बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी 10 ऑक्टोबरला सूरतमधील न्यायलयात उपस्थित राहणार आहेत.
या संदर्भात राहुल गांधी यांना जुलै महिन्यात समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यातून राहुल गांधी यांना सूट देण्यात आली आणि या प्रकरणाची सूनावणी ऑक्टोबरमध्ये निश्चित करण्यात आली होती.
अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेने दाखल केलेल्या बदनामीच्या गुन्हेगारीविषयक खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी यांना दि. 11 ऑक्टोबर रोजी उपस्थित रहायचे आहे. नोटबंदीनंतर या बॅंकेमधून 750 कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
त्यावरून बॅंकेच्या अध्यक्षंनी राहुल गांधींविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना या वर्षी जुलै महिन्यात जामीन मंजूर झाला अहे.