पुणे – एका व्यावसायिकावर टोळक्याने कोयत्याने वार करुन त्यांच्याकडील रोकड लुटली. या घटनेत व्यावसायिक गंभीर जखमी झाले. हीघटना सोमवारी महंमदवाडीतील सय्यदनगर येथे घडली.
याप्रकरणी मुजीब तांबोळी (वय 25, रा. मंगळवार पेठ) यांनी वानवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे कोंढवा येथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. तेथे अफसान शेख हा कामाला होता. तांबोळी यांनी काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीकडून 27 हजार 500 रुपयांचे जुने एलईडी टीव्ही खरेदी केले होते. मात्र, त्याचे पैसे देणे बाकी होते. सोमवारी दुकान बंद होते. त्यामुळे त्यांनी सोमवारी संबंधित व्यक्तीला पैसे देण्यासाठी फोन केला. तेव्हा त्यांना उशीर होणार असल्याने तांबोळी हे अफसानच्या घरी गेले.
मात्र, तो बाहेर गेल्याने ते त्याच्या सय्यदनगर येथील घराखालीच थांबले. तेव्हा हातात कोयते, पालघन घेऊन तेथून जाणाऱ्या टोळक्यातील एकाने तांबोळी यांच्यावर पालघनने वार केला. त्यानंतर त्यांच्या शरीरावर आणखी वार केले. त्यापैकी एकाने तांबोळी यांना मारहाण करत मोबाइल व रोकड काढून घेतली.