पुणे – तब्बल 126 कोटी रुपये जीएसटी अपहार केल्याप्रकरणी शहरातील व्यावसायिकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस. एस. घोरपडे यांनी हा आदेश दिला.
शहरात गेल्या महिनाभरात जीएसटी गुप्तचर विभागाच्या (डीजीजीआय) अधिकाऱ्यांनी उघडकीस आणलेला हा दुसरा मोठा अपहार असून, यापूर्वी 126 कोटी रुपयांचा जीएसटी अपहार जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांनी उघड केला होता.
संतोष दोशी (रा. मोदी बाग, शिवाजीनगर) असे जामीन फेटाळलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असलेल्या संतोष दोशीला 17 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. आरोपीने जामिनावर मुक्तता होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला.
डीजीजीआय महसूल गुप्तचर खात्याच्या वतीने विशेष सरकारी वकील संदीप घाटे यांनी आरोपीला जामीन देण्यास विरोध केला. जीएसटी आयुक्तांना अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीला अटक करण्यासाठी आदेश देण्याचे पूर्ण अधिकार आहेत, अटक करण्यापूर्वी मूल्यांकन करण्याची आवश्यकता नाही. हा गुन्हा देशाची आर्थिक परिस्थिती खिळखिळी करणारा असून, अशा गंभीर गुन्ह्यामध्ये जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद घाटे यांनी यावेळी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला.