पुणे – राज्यशासनाकडून आता थेट पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकातही घुसखोरी करण्यात आली असून, राज्यातील एका मोठ्या नेत्याच्या आदेशाने अंदाजपत्रकात एका योजनेसाठी 2 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. पण, संबंधित विभागांनाच याची माहिती नसल्याचे समोर आले आहे.
महिलांशी संबंधित ही योजना असली, तरी महिला व मुलांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या समाज विकास विभागालाही या योजनेची कोणतीही कल्पना नाही. “माहेर माझे- आजोळ बाळाचे’ असे या योजनेचे नाव आहे.
आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतेच पालिकेचे 2023-24 वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले आहे. सुमारे 9 हजार 500 कोटींचे हे अंदाजपत्रक असून, त्यात केवळ “हेल्दी पुणे’ तसेच श्वानांसाठी “डॉग पार्क’ अशा दोनच नव्या योजना प्रस्तावित आहेत. मात्र, सोबतच आरोग्य विभागाच्या तरतुदींमध्ये “माहेर माझे- आजोळ बाळाचे’ या नावाने नवीन योजना प्रस्तावित केली आहे. याबाबत एकाही अधिकाऱ्याला माहिती नाही, तसेच ज्या लेखापाल विभागाने हे अंदाजपत्रक तयार केले त्यांनाही या योजनेची माहिती नसल्याचे समोर आले आहे.
नेत्याचा फोन आणि योजनेचा समावेश
या योजनेचा समावेश अंदाजपत्रकात करण्यासाठी एका मोठ्या नेत्याने आदेश दिल्याचे समोर आले आहे. या योजनेचे नाव तसेच तरतूद करण्यास प्रशासनास सांगण्यात आले. अंदाजपत्रक लागू झाल्यानंतर ही योजना काय असेल, ती कशासाठी असेल त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल, हे कळविले जाणार आहे. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच अशा प्रकारे योजनेचा समावेश केल्याने महापालिकेवर प्रशासक नियुक्त असल्याने कारभारात राजकीय हस्तक्षेप का? असा प्रश्नही उपस्थित होतो.