सातारा – जैव व वैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा नाहरकत दाखल तयार करुन, तो न्यायालयात सादर केल्याप्रकरणी “नेचर इन नीड सीबीएमडब्ल्यूटीएफ’ या संस्थेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 17 फेब्रुवारी 2022 ते 7 फेब्रुवारी 2023 दरम्यान घडली.
याप्रकरणी सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश लक्ष्मण राठोड यांच्या फिर्यादीवरून, “नेचर इन नीड’ संस्थेच्या आप्पासाहेब बळवंत जाधव (रा. कर्जगार चेंबर्स, इंजिनिअरिं असोसिएशनसमोर, शिवाजीनगर, कोल्हापूर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यासंबंधीच्या फिर्यादीत नमूद आहे की,
“नेचर इन नीड सीबीएमडब्ल्यूटीएफ’ संस्थेस जैव व वैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोशेजारी सातारा हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनच्या मालकीच्या सोनगावमधील गट नं. 83 मध्ये प्लॅंट चालवायला दिला जात आहे. हा प्लॅंट चालवण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रात फेरफार करून व मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही करून दाखला तयार केला. हा दाखला न्यायालयात सादर करून शासनाची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.